सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील ९०० गावांचे आराखडे तयार

रत्नागिरी:- प्रत्येक गाव स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावस्तरावर सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन करण्याचे आराखडे बनविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील १ हजार ५०६ गावातील ९०० गावांचे आराखडे तयार झाले आहेत. यासाठी शासनाकडून १६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

 याचबरोबर प्लास्टीक व्यवस्थापनासाठी १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधीही अधिकचा दिला आहे.
केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन टप्पा २ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी यापूर्वी कुटुंब संख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करुन देण्याची तरतूद होती. तथापि, केद्र शासनाच्या सुधारीत सूचनांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या अंतर्गत वार्षिक कृती आराखडयात वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहन अनुदान, सार्वजनिक शौचालय बांधकाम तसेच सांडपाणी विल्हेवाट लावणे, कचरा गोळा करुन त्यापासून खत निर्मिती, मैल्या पासून खत निर्मिती, प्लास्टीक व्यवस्थापनाचा समावेश आहे. ग्रामीण भागात अशुध्द पाण्यामुळे, अस्वच्छ परिसरामुळे व वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्भवणा-या रोगांमुळे पिडीत असलेल्या ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावणे हा ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, पर्यायाने जीवनस्तर, उंचावण्यासाठी प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

या अभियानांतर्गत नाचणे (ता. रत्नागिरी) येथे बायोगॅस प्रकल्पातून वीजनिर्मिती आणि मैला, गाळ व्यवस्थापनातून खत निर्मीतीचा १ कोटी ३० लाखाचा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या पध्दतीने गावातील कचरा एकत्र करुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. लोकसंख्येनुसार निधी मिळणार असल्याने त्यानुसार आराखडे बनवण्यात येत आहेत. स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी ग्रामपंचायतीच्या मदतीने काम करत आहेत. आतापर्यंत ९०० गावांचे आराखडे तयार झाले आहे. आराखडे मंजूरी, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर पावसाळ्यानंतर साधारणपणे ऑक्टोबरनंतर या योजनेतील कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कामे २०२२-२३ या आर्थिक वर्षात पूर्ण करावयाची आहेत.