सह्याद्रीनगर येथून महिलेची बॅग चोरट्यांनी केली लंपास

संगमेश्वर:- देवरुख व परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील वरचीआळी येथील घरफोडीची घटना ताजी असताना शुक्रवारी सह्याद्रीनगर येथील घरातून महिलेची बॅग चोरट्यांनी लंपास केली. या चोरीचा छडा लावणे, हे पोलीस यंत्रणेसमोर आव्हान ठरले आहे.

गुरुवारी देवरुख बसस्थानकातून एका महिलेची पर्स चोरट्यांनी लांबवत पलायन केले. हा प्रकार सकाळी 10 च्या सुमारास घडला होता. आरडाओरडा झाल्याने हा चोरटा पर्स टाकून पोबारा करण्यात यशस्वी झाला. सीसीटीव्हीत हा चोरटा कैद झाला. मात्र या चोरट्याला अद्याप पकडण्यात आलेले नाही. शहरातील वरची आळी येथे रस्त्यालगत संजय बांदरकर यांचे घर भरदुपारी चोरट्यांनी फोडून 4 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 5 हजाराची रोख रक्कम असा एकूण सुमारे 4 लाखाचा ऐवज लंपास केला. तसेच येथील वनिता पवार यांचे घर चोरट्यानी फोडून 2 हजाराची रोख रक्कम लांबवली. या चोरट्याचा पर्दाफाश करण्यासाठी शुक्रवारी श्वानपथक, ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. ही घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास सह्याद्रीनगर येथील एका घरातून चोरट्यांनी बॅग लंपास केली आहे. या बॅगमध्ये 7 हजार रूपये किंमतिचे सोन्याचे टॉप्स, 3 हजार 500 रूपये किमतीचे कानातले वेल गोल, 13 हजार रूपये रोख रक्कम असा एकूण 23 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.