उपाध्यक्ष उदय बने यांचा दौरा; स्थलांतराचा मोठा प्रश्न
रत्नागिरी:- सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेल्या गावांमधील परिस्थिती गंभीर आहे. अति पावसामुळे डोंगरांना भेगा गेल्या असून भविष्यात भूस्खलनाची भीती आहे. त्यामुळे पायथ्याशी असलेल्या गावांच्या स्थलांतराचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. पोसरेत डोंगरमाथ्यावर भेगा गेल्या आहेत, तर येगाव, तिवरे भागातील परिस्थिती गंभीर आहे, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी भागाचा दौरा केल्यानंतर दिली.
प्रमाणापेक्षा अधिक पडलेला पाऊस, भरतीची वेळ आणि कोळकेवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी यामुळे वाशिष्ठी नदीपात्र सोडून वाहू लागली. या वेळी निर्माण झालेल्या जलप्रलयाने वाशिष्ठी किनाऱ्यावरील बारा गावांना मोठा फटका बसला. सह्याद्रीच्या रांगातील अनेक दुर्गम गावात दरडी कोसळल्या, रस्ते खचले. परिस्थिती निवळल्यानंतर गेले चार दिवस जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी स्थानिक सदस्य आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रतिकूल परिस्थितीत दौरा केला. काही गावात ते प्रत्यक्ष जाऊन आले तर काही ठिकाणी पूल वाहून गेल्यामुळे जाताच आले नाही.
याबाबत ते म्हणाले, ‘चिपळूण शहरापासून ४० किलोमीटर अंतरावरील सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेल्या चोरवणे गावाकडील रस्त्याची दुरवस्था झाली होती. दोन दिवसात काडवली, वावे, पोसरे, कळंबस्ते, वालोपे, खेर्डी या वाशिष्ठी किनाऱ्यावरील गावांना वाशिष्ठीच्या रौद्ररूपाचा फटका बसला. नदीने पात्र बदलले असून भविष्यात त्याचा आणखी फटका बसणार आहे. तेथील संपर्क तुटलेला होता. किनाऱ्यावरील शेती वाहून गेली. नुसतेच पीक नव्हे तर जमीन खणून गेली होती. महावितरणचे विद्युत खांब वाहून गेल्याने वीज गेली. चिपळूणमधील दादर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाण्याच्या मार्गात अनेक अडथळे होते. तिथे जाणेही अशक्य होते. विहिरी वाहून गेल्या आहेत. वाशिष्ठी किनार्यावरील १२ गावात ही परिस्थिती होती. भातशेती वाहून गेल्यामुळे भविष्याची चिंता भासणार आहे.
पावसामुळे डोंगरातील माती पाणी गेल्यामुळे सैल झाली आहे. त्यामुळे डोंगर भागात अजूनही भेगा गेल्या आहेत. तिथे भविष्यात भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागात बऱ्याच ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी लोकवस्ती आहेत. खेड तालुक्यातील पोसरे गावात कोसळलेला डोंगराच्या ठिकाणी माथ्यावर भेगा पडल्या आहेत. पोसरेत प्रशासनाकडून मदतकेंद्र सुरू केले आहे, असे बने यांनी सांगितले.