रत्नागिरी:- बाळ दत्तक देणे-घेण्याची कायदेशीर प्रक्रिया फार काटेकोरपणे पाळावी लागते. सहाय्यक उपनिबंधक कार्यालयाने नुकतेच झालेले दत्तक विधानपत्र नोंदणी कायदेशीररित्या केले आहे की नाही, याची शहर पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. उपनिबंधक कार्यालयात ही नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाली असल्यास संबंधित अधिकार्यांविरुद्धही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.
रत्नागिरीतील उपनिबंधक कार्यालयात करारनामा, खरेदीखत, गहाणखत, हक्कसोडपत्र, गहाणखत प्रत्यंतरण, मृत्यूपत्र, मुखत्यारपत्र नोंदणी केली जातात. वर्षभरात सात ते साडेसात हजार प्रकरणांची नोंद होत असते. यामध्ये दत्तक विधानपत्राची नोंदणी वर्षभरात एखादीच होत असते,असे सहाय्यक उपनिबंधक एस. एस. जयवंत यांनी सांगितले. चालु वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दत्तक विधानपत्र नोंदणी संदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे.
दीड महिन्यांच्या बाळाची विक्री झाली असून त्याचे दत्तक विधानपत्र उपनिबंधक कार्यालयात झालेल्या नोंदणी संदर्भात बाळ दत्तक देणारे आणि घेणार्यांची दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल आहे. न्यायालयात हे प्रकरण सुरु असतानाच बाळ दत्तक देणार्या महिलेच्या तक्रारीनुसार या महिलेच्या पतीसह आम्ही चार जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या तक्रारीच्या तपासात दुय्यम निबंधक कार्यालयातील दत्तक विधानपत्राची नोंदणी योग्यरित्या किंवा कायदेशीरपणे झाली आहे की नाही,याची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. या नोंदणीप्रक्रियेमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकार्यांनाही आरोपी केले जाण्याची शक्यता आहे.