रत्नागिरी:- दिवाळीसाठी जिल्ह्यातील बाजारपेठा सजू लागल्या आहेत. पण यंदा खरेदीला महागाईची झालर लागलेली दिसत आहे. विशेषत: दिवाळीच्या फराळाला लाडू, चकली, करंजी, शंकरपाळी, चिवडा सार्याच फराळांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झालेली दिसत आहे.
दिवाळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. तेल, तूप, साखर, गुळापासून सार्याच वस्तूंचे भाव वाढले आहेत. त्यामुळे फराळांच्या किमती तर 20 ते 25 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंंदा फराळ करताना तोलुन मापुनच करावा लागणार आहे.
फराळासाठी लागणारे जिन्नस म्हणजे साखर, चणाडाळ, रवा, पिठीसाखर, मैदा, पोहे, बदाम, काजू यांच्या किमती वाढल्या आहेत. चणाडाळ 75 रूपये किलोवरून 90 रूपये किलोपर्यंत पोहोचली आहे. सुके खोबरे 150 रुपयांवरून 200 रुपयांवर पोहोचले आहे. मैद्याच्या किमतीत फार फरक पडलेला नाही.
फराळासाठी लागणारे जिन्नस म्हणजे तेल आणि डालडा गेल्यावर्षीच्या तुलनेत डालडा 140 रूपयांवरून 180 रुपयांवर तर खाद्यतेलाचे उतरलेले दर पुन्हा 10 ते 25 रुपयांनी वाढले आहेत. चांगल्या प्रतीचे तूप 500 ते 600 रुपये किलोवर गेले आहे.
घरगुती गॅसपासून सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने फराळाच्या किमती वाढवण्याशिवाय विक्रेत्यांकडे पर्याय नाही. विविध महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्तात फराळ उपलब्ध करून देत आहेत. मात्र, यंदा बचत गटांनीही फराळाच्या किमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरवर्षी वाढत जाणार्या महागाईने सर्वसामान्यांचे सणासुदीत कंबरडे मोडत आहे. ही स्थिती बदलणार कधी? असा सवाल अनेकांना पडत आहे.