सरस दिवाळी महोत्सवातील चार दिवसात 15 लाखांची उलाढाल

रत्नागिरी:- महिला बचत गटांनी दिवाळीसाठी तयार केेलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रत्नागिरीत आयोजित सरस दिवाळी महोत्सवाच्या चार दिवसात सुमारे १५ लाख रुपयांची उलाढाल झाली. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढील महिन्यात गणपतीपुळेत होणार्‍या सरस प्रदर्शनात वेगळी संकल्पना राबविली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले.

छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर आयोजित चार दिवस महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या दिवाळी महोत्सवात ५५ जिल्हा परिषद गटातील एक या प्रमाणे बचत गटांना स्टॉल देण्यात आले होते. तसेच वीस स्टॉलवर खाद्य महोत्सव भरविण्यात आला होता. यावेळी श्री. जाधव म्हणाले की, दरवर्षी गणपतीपुळेमध्ये सरस प्रदर्शन भरवली जाते. तिथे पर्यटकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होत असल्यामुळे बचत गटांच्या स्टॉलना प्रतिसाद चांगला मिळतो. परंतू रत्नागिरीत प्रथमच जिल्हास्तरावरील प्रदर्शन भरविण्यात आले. त्याला ग्राहकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने बचत गटांना चांगला फायदा मिळाला. चार दिवसात सुमारे पंधरा लाख रुपयांची उलाढाल झाली. महिलांची उन्नतीसाठी केलेला कार्यक्रम यशस्वी झाला आहे. याच पध्दतीने डिसेंबर महिन्याच्या अखेरीस गणपतीपुळेत होणार्‍या सरस प्रदर्शनात वेगवेगळ्या संकल्पना राबविण्यात येतील. जेणेकरुन पर्यटकांचा प्रतिसाद चांगला मिळेल. तसेच मी अध्यक्ष आहे, याची छापही पडेल. पुर्वी बचत गटांची नावे फक्त ऐकायला मिळायची आता ते करत असलेल्या कामांची माहिती पुढे येत आहे. सर्वचस्तरावरील उत्पादने प्रदर्शनात मांडण्यात येतील.