रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सहा जणांना अटक
रत्नागिरी:- सरकारी सेवेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून वृध्दाची सुमारे १ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ८ जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन संशयित फरार आहेत, तर ६ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .
फसवणूकीची ही घटना फेब्रुवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत पानवल येथे घडली आहे. साईराज विलणकर ( २७ ), वैशाली दरडे उर्फ नेहा आखाडे ( ३८, दोन्ही रा.खडपेवठार , रत्नागिरी ), साईराज मोरे ( २६ , रा . शिरगाव, रत्नागिरी ), अनोफ झारी ( रा.कोकणनगर, रत्नागिरी ), धिरज खलसे ( २३ , रत्नागिरी ) आणि ओमकार तोडणकर ( पेठकिल्ला , रत्नागिरी ) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत . तर पूजा विलणकर ( रा . खडपेवठार, रत्नागिरी ) आणि आशिष पाथरे ( रा.साडवली, देवरुख ) ही दोघे फरार आहेत . त्यांच्याविरोधात शंकर नारायण लिंगायत ( ६७ , रा.पानवल, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
त्यानुसार, शंकर लिंगायत हे पानवल येथे पुजारी म्हणून काम करतात.फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांची साईप्रसाद विलणकरशी ओळख झाली होती. तेव्हा त्याने मी बांधकाम खात्यात नोकरीला असल्याची बतावणी करुन तुमच्या मुलाला चालक म्हणून नोकरीला लावतो असे सांगत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती . दरम्यान, आपल्या मुलाला सरकारी नोकरी मिळेल या आशेने लिंगायत यांनी पैस देण्याची तयारी दाखवली होती. तेव्हा साईराजने अन्य ७ संशयितांशी संगनमत करुन फेब्रुवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२० या एक वर्षाच्या कालावधीत लिंगायत यांच्याकडून वेळोवेळी असे एकूण १ लाख १५ हजार रुपये उकळले. परंतू पैसे देऊनही आपल्या मुलाला नोकरी न मिळाल्याने लिंगायत यांनी साईराजकडे पैशांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शंकर लिगायत यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती