वातावरणातील बदलाचे परिणाम; सावधानतेचा इशारा
रत्नागिरी:- निळसर प्रकाशात चमकणार्या समुद्र किनार्यावरील आकर्षक लाटांच्या देखण्या सौंदर्यामागे निसर्गाने पर्यावरण र्हासाची धोक्याची घंटा दिली आहे. प्रदूषण, ऑक्सिजन कमी होणे आणि कार्बनडाय ऑक्सईडची वाढ, वातावरणीय बदल आणि ग्लोबल वार्मिंग या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजेच निळसर प्रकाश देणार्या प्लवंगांची (नॉकटील्युका) होणारी वाढ. ती किनार्यावरील अन्नसाखळी ब्रेक करत असल्याचा धोका संशोधकांनी व्यक्त केला आहे.
रत्नागिरीसह सिंधुुदुर्ग किनारी रात्री दिसणार्या निळ्या लाटा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. त्या निळ्या प्रकाशामागेही निसर्गाने धोक्याचा इशारा दिला आहे. याला ज्येष्ठ सागरी जीव अभ्यासक प्रा. स्वप्नजा मोहिते यांनी दुजोरा दिला. 2017 साली सचिन देसाई यांनी प्रथम या लाटांची माहिती पुढे आणली. त्यानंतर प्रा. मोहिते यांनी त्या प्लवंगांवर अभ्यास सुरू केला. त्याची माहिती घेतल्यानंतर हे प्लवंग पर्यावरणाला किती धोक्याचे ठरु शकतात यावर प्रकाश टाकला.नॉकटील्युका हा एकपेशीय डायनोफ्लॅजेलेट गटात मोडणारा प्राणी प्लवंग आहे. डोळ्यांनी दिसू शकणारा हा सूक्ष्मजीव शरीरातून काजव्यासारखा जैविक प्रकाश निर्माण करतो. उसळणार्या लाटांमुळे ते प्राणी उद्दीपित होतात आणि निळसर प्रकाशाने चमकू लागतात. नॉकटील्युका सिंटीलांस या शास्त्रीय नावाने त्याची ओळख असून हा प्राणी सध्या समुद्रात दिसणार्या निऑन लाईट्स सारख्या हिरव्या निळ्या प्रकाशामुळे चर्चेत आहे. त्याला सी स्पार्कल म्हणूनही ओळखले जाते. या प्राण्यावर जगभर संशोधन सुरू आहे. थंडीत अचानक येणार्या विंटर ब्लूम्समुळे उत्तर अरेबियन समुद्र ते अरेबियन पेनिन्सुला दरम्यान हे प्राणी मोठ्याप्रमाणात दिसत आहेत. नेहमी लालसर रंगाने दिसणारा हा प्राणी सध्या हिरवट रंगाचा दिसून येतो. दिवसा पाण्यावर हिरवट शेवाळासारखा थरासारखा दिसतो. त्या प्राण्याच्या शरीरात पेडीमोनाज नॉकटील्युके या शैवाल वर्गीय सजीवांना आसरा दिला आहे. त्यामुळे तो हिरवट दिसतो आणि त्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून अन्न ही प्राप्त करू शकतो.
जलचरांची सुक्ष्म पिल्ले, अंडी यावर उपजीविका करणारा हा प्राणी, म्हणूनच अन्न उपलब्ध नसेल तरीही जगू शकतो. त्यात मोठ्या प्रमाणात साठणार्या अमोनियामुळे जेलीफिश सोडल्यास इतर कोणी त्याला खात नाहीत. किनार्याकडे सुक्ष्म खाद्याची उपलब्धता आणि वातावरण असल्याने नॉकटील्युकाचे थवे किनार्याकडे सरकतात. या ब्लूम्समुळे समुद्रातील डायटम्सच्या प्रमाणात मात्र लक्षणीय घट झाली आहे. डायटम्स ही वनस्पती प्लवंग समुद्रातील प्राथमिक उत्पादक आहेत आणि समुद्रातील जैव साखळी ही या प्लवंगावर अवलंबून असते. तीच जैव साखळी या निळ्या प्लवंगामुळे खंडित होण्याची भिती संशोधकांकडून व्यक्त केली जात आहे.