रत्नागिरी:- सण आयलाय गो, आयलाय गो, नारळी पुनवेचा… असा ठेका धरत रत्नागिरीत खारवी, भंडारी समाजाने समुद्राला श्रीफळ अर्पण करीत शांत होण्याचे आवाहन केले आणि जाळ्यात भरपूर म्हावरा मिळू दे अशी प्रार्थना केली. रत्नागिरीत नारळी पौर्णिमा उत्सव मोठा उत्साहात नागरिकांनी साजरा केला.
रत्नागिरी शहरामध्ये मांडवी व भाटे, पांढरा समुद्र, भगवतीबंदर या ठिकाणी नागरिकांनी समुद्राची पूजा करीत श्रीफळ अर्पण केला. रत्नागिरी पोलीस दलातर्फे मुख्यालय ते मांडवीपर्यंत श्रीफळाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्याचप्रमाणे रत्नागिरी सीमा शुल्क विभागाच्यावतीनेही समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यात आला.
रत्नदुर्गवासीन श्रीदेवी भगवती मंदिरातून श्रीफळ ढोलताशांचा गजरात भगवतीबंदरात आणून विधीवत समुद्राची पूजा करत श्रीफळ अर्पण करण्यात आला. रत्नागिरी शहरासह किनार्यावरील विविध गावामधून प्रथेप्रमाणे श्रीफळ अर्पण करण्यात आला.
रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे गावात प्रथेप्रमाणे खारवी बांधवांनी श्रीफळाची भव्य सोनेरी प्रतिकृती तयार करुन गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पारंपारिक पध्दतीने नाचत श्रीफळ समुद्रकिनारी आणण्यात आला व समुद्राला अर्पण करण्यात आला.