दाभोळ:- दापोली तालुक्यातील लाडघर येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाला समुद्रातील पाण्यात सूर मारण्याचा मोह आवरला नाही. त्याने मित्राच्या खांद्यावरून पाण्यात मारलेला सूर त्याच्या जिवावर बेतला. रमेश अन्जाबा गाढवे (वय ४०, रा. जेजुरी, पुणे) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ७) दुपारी बाराच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या जेजुरी गावातील १० पर्यटक दापोली तालुक्यातील लाडघर येथे शनिवारी सकाळी आले होते. लाडघर येथील एका रिसोर्टवर त्यांनी आराम केला व दुपारी ते सर्व समुद्रात पोहायला गेले. पोहता पोहता त्यातील रमेश गाढवे याला समुद्रातील पाण्यात सूर मारायाची लहर आली. त्याने गौरव देशमुख याच्या खांद्यावरून पाण्यात सूर मारला. पण त्यात मानेला झटका बसून मानेला दुखापत झाली. रमेश गाढवे याला लगेचच त्याच्या मित्रांनी उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल अजित गुजर करत आहे