रत्नागिरी:- यावर्षी पावसाने दमदार सुरूवात केल्यामुळे जिल्ह्यातील पूरजन्य गावातील स्थिती वगळता अन्य गावातील पिकांची स्थिती उत्तम आहे. जिल्ह्यात आतापर्यत २६,२०४ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४२३२.२ मिलीमीटर इतका पाऊस जास्त झाला आहे.
जिल्ह्यात सरासरी ३,५९१ मिलीमीटर पाऊस पडतो. चालू वर्षी पहिल्या अडीच महिन्यातच सरासरी २,९११.५६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले आहे. जिल्ह्यात ६३ हजार ३९३ हेक्टर क्षेत्रावर भात, १० हजार ९८ हेक्टर क्षेत्रावर नागली, १.४९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, ०.६३ हेक्टर क्षेत्रावर गळितधान्य तसेच ०.४७ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य लागवड केली आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी किनार्या लगतच्या गावात पाणी शिरल्याने पुराच्या पाण्यासह माती दगड, भात खाचरात येऊन साचले. त्यामुळे लागवड केलेल्या शेतीचे नुकसान झाले असले तरी अन्य भागातील हळवी, गरवी, निमगरव्या वाणांची स्थिती उत्तम आहे. शेतकर्यांनी तण बेणणीची कामे पूर्ण केली असून, खताची मात्राही देण्यात आली आहे. हळवे भात पोटरीस येण्याच्या तयारीत आहे. रोपाची वाढही चांगली झाली आहे. संततधार पावसापेक्षा ऊन पाऊस असे संमिश्र वातावरण राहिले तर पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनही उत्तम होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत पीक परिस्थिती उत्तम असून कीड, रोगराईचा प्रादूर्भाव झालेला नाही.