खेड:- तालुक्यातील लाेटे औद्याेगिक वसाहतीतील कंपनीत स्फाेट हाेण्याचे प्रकार काही थांबत नसून, येथील समर्थ केमिकल कंपनीत स्फाेट हाेऊन तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्याने घडली. यामध्ये सहाजण गंभीररित्या भाजले असून, तिघांना मिरज येथे व अन्य तिघांना परशुराम हाॅस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
लोटे एमआयडीसीत रविवारी सकाळी पुन्हा स्फोट झाला. येथील समर्थ केमिकल या कंपनीत हा स्फोट झाला. या स्फोटाने 3 कामगारांचा बळी घेतल्याची प्राथमिक माहिती पुढे येत असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील तीन कामगारांना सांगली येथे हलवण्यात आले आहे,तर अन्य तीन कामगारांना परशुराम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
सकाळी हा स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी मदत ग्रुप सह अग्निशमन दल रवाना झाले होते. स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे महामार्गावर धुराचे लोट दिसत होते. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होता. यासाठी घटनास्थळी खेड अग्निशमन बंब दाखल सुद्धा दाखल झाला होता.
मात्र पुन्हा एकदा 3 जणांचा हकनाक बळी गेला असून एम आय डी सी मधील कारखान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी घरडा केमिकल्स मध्ये सुद्धा अशाच प्रकारे स्फोट होऊन निष्पाप कामगारांचे बळी गेले होते. त्यावेळी कामगारांना काम करताना योग्य सुरक्षा पुरवण्यात अली नसल्याचे पुढे आले होते.