समग्र शिक्षा अभियान कर्मचार्‍यांचे आंदोलन स्थगित

जिल्ह्यातील 107 कर्मचारी झाले होते आंदोलनात सहभागी

रत्नागिरी:- समग्र शिक्षा अभियानात कार्यरत कर्मचार्‍यांनी 4 मार्चपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली होती. त्याचबरोबर येथील आझाद मैदानावरही बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र प्रशासनाकडून ठोस असे आश्वासन मिळाल्यानंतर सध्या हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे रविंद्र कांबळे यांनी दिली.

सर्व शिक्षा अभियान तसेच समग्र शिक्षा योजना अंतर्गत 2002 पासून राज्यात, जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा, तालुका व महानगर पालिका स्तरावर सहाय्यक कार्यक्रमाधिकारी, विषय साधन व्यक्ती, कनिष्ठ अभियंता, डाटा, एमआयएस कोऑर्डिनेटर, दस्तऐवज व संशोधक सहायक व वरिष्ठ लेखा सहायक अशा पदांवर कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी उच्च पदवीधारक बीई, एमएससी बीएड अशा उच्च शैक्षणिक पात्रताधारक आहेत. या सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांची नेमणूक जाहिरात देऊन बिंदुनामावली, लेखी परीक्षा, मुलाखत अशी कार्यपद्धती अवलंबून झालेली
आहे.

हे कंत्राटी कर्मचारी 18 ते 20 वर्षापासून शाळा बांधकामे, शिक्षकांना अध्यापन, शालेय शिक्षणविषयक प्रशिक्षण, शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन, शाळा भेट करून आदर्श पाठ घेणे, विद्यार्थी मार्गदर्शन तसेच शासनाच्या शिक्षणविषयक योजना राबविणे अशी कामे अत्यंत तुटपुंज्या मानधनावर करत आहेत. त्यांची नवीन नोकरी मिळण्याची वयोमर्यादाही संपलेली आहे. 18 ते 20 वर्षापासून उपोषण आंदोलन व मोर्चाद्वारे वारंवार प्रश्न शासन दरबारी मांडले गेले. परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचे निर्णय या बाबतीत घेतल्या गेल्या नाहीत. तसेच मानधनाव्यतिरिक्त शासनाच्या इतर कोणत्याही आर्थिक लाभ योजना किंवा लाभ कायम कर्मचार्‍यांप्रमाणे त्यांना मिळालेला नाही.

समग्र शिक्षा योजनेतील काही कर्मचार्‍यांना 8 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाद्वारे सेवेत कायम केले आहे. तर काही कर्मचारी अजूनही सेवेत नियमित होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
यामागण्यांबाबत 4 मार्चपासून कामबंद आंदोलन व आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले होते. जिल्ह्यातील 107 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. शासनाने ठोस असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.