सत्ता संघर्षात रत्नागिरीची शिवसेनेलाच साथ; चारही शिलेदार सेनेसोबत

रत्नागिरी:- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या नाराजी नाट्यामुळे मविआ सरकार धोक्यात आले असले तरी रत्नागिरी जिल्हा मात्र शिवसेनेच्या सोबत ठाम असल्याचे चित्र आहे. रत्नागिरीतील चारही आमदार पक्षासोबत यापुढेही आपण कायम पक्षासोबतच ठाम राहू अशी प्रतिक्रिया चारही आमदारांनी दिली.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पुन्हा सत्तासंघर्ष सुरू झाला. नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे सेनेच्या आमदारांचा एक गट घेऊन नॉट रिचेबल झाले. ते थेट सुरत मध्ये पोहचले. त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांमध्ये रायगड मधील तीन आमदार असल्याची चर्चा आहे. मात्र याला रत्नागिरी जिल्हा अपवाद ठरला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सेनेचे आमदार ना. उदय सामंत, भास्कर जाधव, राजन साळवी आणि योगेश कदम हे पक्षासोबतच आहेत. मुंबईतील बैठकीसाठी हे चारही आमदार रवाना झाले आहेत. आम्ही कायम पक्षासोबतच राहू अशी प्रतिक्रिया चारही आमदारांकडून आली आहे.