संस्थात्मक विलीगिकरणासाठी मुंबईतून आलेल्या नर्सवर दबाव

हातीस- टेंभ्ये येथील घटना; कारवाईची मागणी

रत्नागिरी:- स्वगृही विलगीकरण करण्याचा तहसीलदारांचा आदेश धाब्यावर बसवून संस्थात्मक विलगीकरण कक्षात जाण्यासाठी जबरदस्ती करणार्‍या रत्नागिरीतील टेंभ्येच्या पदाधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी हातीसच्या रहिवासी नीता गोपीनाथ नागवेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना दिले.

कोविड-19 बाबतीत शासन निर्णयाला न जुमानता गावात ग्रामस्थांची अनधिकृतरित्या बैठक घेऊन आपणाला कोणतेही सहकार्य करू नये, अशी दहशत पुढार्‍यांनी निर्माण केली. विलगीकरण मुदतीत कोणत्याही व्यक्तीस आपणाला सहकार्य करण्यास मज्जाव करून पदाचा गैरवापर करीत आपणाला जणू वाळीत टाकल्यासारखे राहावे लागले असेही निवेदनात म्हटले आहे. 

नीता या माहिममधील हिंदूजा रुग्णालयात नर्सिंग पर्यवेक्षक या पदावर कार्यरत होत्या. दादर येथील डॉ. एन. जी. सोळंकी यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन ई-पास घेऊन खासगी वाहनाने मुंबई ते रत्नागिरी असा 19 मे रोजी प्रवास केला. हातीसचे पोलिस पाटील संतोष नागवेकर यांना रत्नागिरी येथील दामले हायस्कूलमध्ये पोहोचल्याची व त्यानंतर घरी येत असल्याबाबत कळवले. त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून आरोग्य पथकामार्फत स्वगृही विलगीकरणाचा शिक्का त्यांच्या हातावर मारण्यात आला. जगन्नाथ रघुनाथ नागवेकर यांच्या रिकाम्या घराच्या परिसरात त्या पोचल्या असता पोलिस पाटील यांचा भ्रमणध्वनी आला. त्यावरून त्यांना हातीसच्या घरापासून दोन किमी अंतरावर निर्जन व जंगल भागातील अंगणवाडीत त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केल्याचे सांगितले. तेथे जेवण, पाणी तसेच सुरक्षित राहण्याची कोणतीच सोय नाही. एकटी महिला असल्याचे सांगताच तेथे तुमच्यासोबत अन्य एका पुरुष व्यक्तीचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. काकांच्या रिकाम्या घरी क्वारंटाईन होण्यास मज्जाव केला. त्यानंतर 25 मे रोजी 22 ते 25 ग्रामस्थांच्या उपस्थितीत सायंकाळी 7 वाजता बैठक झाली. आमच्या घराच्या परिसरात कोणी जायचे नाही, आपणाशी संपर्क करायचा नाही. पाणी, अन्नधान्य व भाजी इत्यादी जीवनावश्यक साहित्य पुरवायचे नाही, असे ठरले. जणू मला वाळीत टाकल्यासारखे झाले. या कालावधीत ग्राम कृतिदलाचा एकही माणूस आपल्या घराकडे फिरकला नाही. एक महिला असतानाही दिलेल्या वागणुकीची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागवेकर यांनी निवेदनात केली आहे.