संगमेश्वर हातीव येथे गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या पकडल्या

साडवली:- कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणाऱ्या दोन गाड्या संगमेश्वर तालुक्यातील हातीव व मारळ येथे भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री पकडल्या आहेत. यानंतर या गाड्या देवरूख पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.

या दोन्ही गाड्यांमधून १५ गुरांची वाहतूक करण्यात येत होती. याप्रकरणी ६ जणांविरोधात देवरूख पोलिस देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ८ लाख ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल देवरूख पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल बुधाजी मांडवकर (रा. पुर्ये तर्फ देवळे, ता. संगमेश्वर) व वसंत चंद्राप्पा कांबळे (रा. चांदोली, आंबा, ता. शाहूवाडी) यांनी उदय दत्तात्रय मांगले (रा. साडवली, ता. संगमेश्वर) यांच्याकडून ४ बैल व १ गाय विकत घेतली. ही गुरे एकमेकांच्या संगनमताने कत्तल करण्याच्या उद्देशाने एका टेम्पोमधून प्राण्यांच्या वाहतुकीचा परवाना नसताना गाडीतून वेदना होईल, असे आखूड दोरीने बांधून दाटीवाटीने भरुन नेली जात होती. हातीव येथे मंगळवारी रात्री १०. ५ वाजण्याच्या सुमारास पकडण्यात आली. ही गाडी भाजपच्या कार्यकत्यांनी पकडली. दुसरीकडे महंमद दादन शेख, अल्ताफ पापूल जातकार व दस्कीर शेख ( रा. बेळगाव यांनी गुहागर तालुक्यातील शृंगारातळी येथील बुवा याच्याकडून ७ गायी व तीन पाडे विकत घेऊन ही गुरे एकमेकांच्या संगनमताने कत्तल करण्याच्या उद्देशाने बोलेरो पिकअकमधून प्राण्यांच्या वाहतुकीचा परवाना नसताना गाडीमधून वेदना होईल अशा पद्धतीने दाटीवाटीने भरुन नेली जात होती. मंगळवारी रात्री ११.५० वाजण्याच्या सुमारास मारळ बसथांबा येथे ही गाडी पकडण्यात आली. ही गाडी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकत्यांनी पकडली. या दोन्ही गाड्या पकडण्यात आल्यानंतर देवरूख पोलिसांना माहिती देण्यात आली. या नंतर पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी सहकाऱ्यांसह त्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली.

यावेळी पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही गाड्या गुरांसह देवरूख पोलीस ठाण्यात नेण्यात आल्या. अवैधरित्या गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार संजय मारळकर करीत आहेत.