संगमेश्वर मधील चार गावात कंटेन्मेंट झोन लागू  

ना. उदय सामंत; दुसऱ्या स्ट्रेनची तपासणी करणार 

रत्नागिरी:- संगमेश्‍वर परिसरातील चार गावात कोरोनाची रुग्ण संख्येत वाढ झाल्याने या ठिकाणी कंन्टेन्टमेंट झोन लागू करण्यात आला आहे. या भागात सापडणार्‍या रुग्णांमध्ये कोरोनाचा दुसरा स्टेन आहे का याचीही आयसीएमआरमार्फत खात्री केली जाणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट दहा टक्केच्या खाली आला असून, जिल्हावासियांसाठी ही सुखद गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते म्हणाले की जिल्ह्यात दहा हजार टेस्टिंगच उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसात सात हजारवर टेस्टिंग वाढवण्यात आले आहे. दि. 1 जून रोजी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 15.07 टक्के होता तो 16 जून रोजी 8.61 टक्के इतका खाली आला आहे. रुग्ण संख्या पाचशेच्या पुढे दिसत असली तरी टेस्टिंगची संख्याही वाढवण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने डॉ. आकाश परब, डॉ. अमर चव्हाण, डॉ. विवेक वाघेला व डॉ. सुहास सेजल या चौघा तज्ज्ञ डॉक्टरांना रत्नागिरीत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे चारही डॉक्टर पुढील पंधरा दिवस जिल्ह्यात राहून मार्गदर्शन करणार आहेत. या डॉक्टरांच्या पथकाने पुणे व मुंबईमध्ये चांगली कामगिरी बजावली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर तालुक्यातील चार गावांमध्ये कन्टेंन्टमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या गावात रुग्ण संख्या झपाट्याने वाढली होती. याठिकाणी परदेशातून काही ग्रामस्थ परतले होते. ते बरे झाल्यानंतर मुंबई, पुण्यात गेले. त्याठिकाणी काहींचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांमध्ये वेगळा स्टेन आहे का याचीही तपासणी आयसीएमआरमार्फत करण्यात येणार आहे. यापूर्वी अमरावतीत वेगळा स्टेन सापडला होता. त्याठिकाणाहून दुसर्‍या लाटेची सुरुवात झाली होती. त्यामुळे विशेष दक्षता घेतली जात असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. रुग्ण संख्येत घट न झाल्यास पुन्हा टाळेबंदीचा विचार केला जाईल असे आढावा बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले होते. यावर बोलताना ना. सामंत म्हणाले की, टाळेबंदीचा निर्णय घेताना प्रशासनाला लोकप्रतिनिधींना विचारात घ्यावे लागेल असे स्पष्ट केले. जिल्ह्यात आतापर्यत 3 लाख 49 हजार 971 जणांचे लसीकरण झाले असून त्यात पहिला डोस 2 लाख 75 हजार 859 जणांनी तर दुसरा डोस 74 हजार 112 जणांनी घेतला असल्याची माहिती दिली.