संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे चिरखाणी वरील ट्रकने अडीच वर्षाच्या बालिकेला ट्रक खाली चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. निश्चिता भरत चव्हाण ( रा. विजापूर) असे दुर्दैवी बालिकेचे नाव आहे.
या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती हुननु चव्हाण (31, सालोगटी, विजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद चिरेखाण मालक मयूर ओकटे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली.
सविस्तर वृत्त असे की, करजुवे येथे मयूर ओकटे यांची चिऱ्याची खाण आहे. या खणीवर मारुती चव्हाण हा ट्रक ड्राइव्हर आहे. निश्चिता ही खेळत असताना चिरे भरून ट्रक चालक गाडी मागे घेत असताना चिमुरडीच्या अंगावरून गाडी गेली. यातच त्या चिमुरडीचा अंत झाला. गुरुवारी रात्री उशिरा या ठिकाणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.