रत्नागिरी:- भारतीय जनता पार्टीने महाआघाडी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, सर्वसामान्य माणसापर्यंत केंद्र व राज्य शासनाचे ध्येयधोरण पोहचवण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रत्नागिरीतील दौर्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहात वाढ झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात पुढील दोन महिन्यात तब्बल साठ हजार घरांमध्ये जाण्याचा संकल्प पदाधिकार्यांनी यानिमित्ताने सोडला आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौर्यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह वाढला आहे.
शिवसेना-भाजपाच्या काळात मागील पंचवीस ते तीस वर्षापूर्वी गुहागर व रत्नागिरी हे मतदार संघ भाजपाच्या ताब्यात होते. परंतु वीस वर्षापूर्वी झालेल्या फेरबदलानंतर दोन्ही ठिकाणी शिवसेनेने वर्चस्व निर्माण केले आहे. शिवसेनेच्या फुटीनंतरही दोन्ही ठिकाणी शिवसेना ठाकरे व शिंदे गटाचे वर्चस्व आहे.
शिवसेनेचे वर्चस्व असतानाही देवरुख व चिपळूणमध्ये थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत कमळ फुलवण्यात यश आले होते. परंतु रत्नागिरीमध्ये मागील काही वर्षात भाजपा पदाधिकार्यांनीही सेनेच्या समोर लोटांगण पसरल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. आक्रमक पदाधिकार्यांना वरिष्ठ पदाधिकार्यांनी दुर्लक्षित केले होते. परंतु काही महिन्यांपूर्वी रत्नागिरीत झालेल्या फेरबदलात जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांना संधी देण्यात आली. याचवेळी माजी आमदार बाळ माने यांच्या खांद्यावर पुन्हा रत्नागिरी विधानसभेची जबाबदारी देताना त्यांना क्षेत्रप्रमुख पद देण्यात आले.
माजी आमदार बाळ माने व राजेश सावंत यांनी अवघ्या काही दिवसात दोन तालुकाप्रमुखांसह जिल्हा व तालुका कार्यकारिण्या तयार करुन, पदाधिकार्यां पक्षासाठी आक्रमक काम करण्याची दिशा दिली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बाळ माने व राजेश सावंत यांच्या खांद्यावर शाबासकीची थाप मारत अवघ्या काही दिवसांमध्ये चांगले काम केल्याचे कौतुक केले. पुढील साठ दिवसात 60 हजार घरांमध्ये जाऊन पंतप्रधान मोदींनी केलेले काम, देशासाठी बजावलेली भूमिका सांगितली जाणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या योजना घरोघरी पोहचवण्याबरोबरच पुढील निवडणुकीत मोदींच्या पाठीमागे सर्वसामान्यांनी खंबीरपणे उभे रहावे म्हणून आवाहन केले जाणार आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या दौर्यात सर्वसामान्यांनी कौल मोदींना दिला आहे.त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, पुढील दोन महिन्यात मतदार संघ संपूर्ण पिंजून काढण्याची तयारी व नियोजन करण्यात आले आहे.