रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या कुवारबाव येथील रेल्वे स्टेशन येथे सॅण्डवीज विकणाऱ्या तरुणाच्या जीवावर बेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सॅण्डवीजसह अन्य खाद्य पदार्थांचीही विक्री केली जाते. शनिवारी प्रवाशासाठी गाडी थांबायच्या अगोदर सॅण्डवीज विक्रीसाठी घेऊन जाणारा तरुण रेल्वेत चढताना रेल्वेच्या प्लॅटफार्म क्र. २ वर पडला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
सुंदरकुमार चंद्रदीप सहानी (वय ३२, रा. पडवेवाडी-कुवारबाव, रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १६) सकाळी साडेसातच्या सुमारास कोकण रेल्वेच्या कुवारबाव रेल्वेस्टेशन प्लॅटफार्म क्रं. २ येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुंदरकुमार सहानी याचे पोटासाठी खाद्य पदार्थ विक्री करणे हे त्याचे उदरनिर्वाह साधन होते. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास प्लॅटफार्म क्र २ येथे गाडी आल्याने तत्काळ घाई-घाईत सॅण्डवीज विकण्यासाठी जात होता. गाडी थांबायच्या अगोदरच त्याने रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र हे नेहमीचेच होते. प्रवासी उतरण्याच्या अगोदरच खाद्य पदार्थ विक्री करणारे हे गाडीत चढत असतात तो घाई-घाईत प्लॅटफार्म क्र. २ वर आलेली गाडी पकडून चढताना त्याचा तोल जाऊन पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तोपर्यत प्रवाशांची गर्दीही तेथे जमली होती. रेल्वे पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना रात्री साडेनऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. मात्र रेल्वे परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.