शेतीच्या नुकसानीचे पंचनामे लवकर करा: ना. सामंत

रत्नागिरी:- तहसिलदारांनी आपल्या यंत्रणेमार्फत येणाऱ्या चार दिवसात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सादर करावेत असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.           

चिपळूण, गुहागर, खेड तसेच दापोली तालुक्यांमध्ये पावसामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानीच्या आढावा आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहातून दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतला यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा  तसेच अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे आदींसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.           

राज्यात अनेक ठिकाणी नेहमीपेक्षा जादा पाऊस झाला आहे.  रत्नागिरीत पावसाचे प्रमाण कमी असले तरी भात पीक कापणीच्या वेळी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.  या पार्श्वभूमीवर आपला दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी चांदेराई तसेच सोमेश्वर, मावळंगे, गावडे आंबेरे, पावस आदी भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी चर्चा केली.            

परतीच्या पावसाचा आणखी चार दिवस अंदाज आहे या पार्श्वभूमीवर स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे देखील सोलापूर नंतर मराठवाडा भागात दौऱ्यावर आहेत.  येत्या आठवड्यात ते कोकण दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवून अधिकाऱ्यांनी जिल्ह्याची बाधितांची पूर्ण माहिती तयार ठेवावी असे सामंत म्हणाले.       

या बैठकीपूर्वी त्यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्याचे वने व भूकंप मंत्री संजय राठोड यांच्या समवेत अधिकाऱ्यांकडून आरे वारे प्राणी संग्रहालयासंदर्भात एका बैठकीत माहिती घेतली.            या भागात पर्यटन वाढीसाठी या अधिवासात नैसर्गिक प्राणी संग्रहालयाची योजना आहे.  यासाठीचा आराखडा या बैठकीत सादर करण्यात आला.  वनधिकारी प्रियांका लगड यांनी यावेळी सादरीकरण केले. या आराखड्यात मूर्त रुप देण्यासाठी वनविभागाने सहाय करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.