रत्नागिरी:- शहरानजिकच्या शेट्येनगर येथे झालेल्या भीषण स्फोटाचे वास्तव पुढे येऊ लागले आहे. बाथरूमच्या लाईटचा स्वीच ऑन करताच पसरलेल्या गॅसच्या स्फोटासमवेत एकाचवेळी फ्रीज, एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट एकाच वेळी झाल्याचे पुढे आले आहे. तिन्ही स्फोट एकाच वेळी झाल्यामुळे स्फोटाची तीव्रता वाढल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. परंतु प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच स्फोटाचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे.
बुधवारी सकाळी अशफाक काझी यांनी रिक्षा धुण्यासाठी जाण्यापूर्वी बाथरूमच्या लाईटचा स्वीच सुरू केला. याचवेळी घरात पसरलेल्या गॅससोबतच फ्रीज, एसीचा कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे फ्रीज उंच उडाला. त्यानंतर स्लॅबलाही स्फोटाने उडवून दिले. यामध्ये स्लॅबखाली सापडून पत्नी व सासू यांचा जागीच मृत्यु झाला होता. तर अशफाक काझी गंभीररीत्या भाजल्याने त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयातून कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
सिलेंडरमधील गॅस खोलीमध्ये पसरल्यानंतर बराच काळ उलटल्यानंतरच त्याची तीव्रता वाढते. परंतु सिलेंडरमधील गॅस बाहेर आल्यानंतर त्याची कल्पना घरातील चौघांपैकी एकाही व्यक्तीला कशी झाली नाही? गॅसमुळे त्यांना श्वसनाचा त्रास का जाणवला नाही असे अनेक प्रश्न या स्फोटाच्या निमित्ताने निर्माण झाले आहेत. स्फोटात मृत झालेल्या मायलेकींवर मजगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नातेवाईक उपस्थित होते.