रत्नागिरी:- शहरानजीकच्या शिळ कदमवाडी येथील जंगलमय भागातील बेकायदेशिर गावठी दारु हातभट्टीवर शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी 8.30 वा.धाड टाकली. या कारवाईत तब्बल 4 लाख 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महेश भार्गव शिंदे (रा.प्रशांतनगर मजगाव रोड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल शांताराम झोरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी शहर पोलिसांना शिळ येथे बेकायदेशिरपणे चालवण्यात येणार्या हातभट्टीची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून 4 लाख 1 हजार 500 रुपयांचे 11 हजार 260 लिटर गुळ नवसागर मिश्रीत कुजके रसायन,15 लिटर गावठी हातभट्टीची दारु व इतर साहित्य असा एकूण 4 लाख 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.