शीळ धरण ऑक्टोबरपर्यंत पूर्ण क्षमतेनेच भरलेले राहणार

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे शिळ धरण आठवडाभरापूर्वी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले होते. त्यावेळी धरणातील पाण्याचा प्रति सेकंदाला 1.01 घनमीटर इतका विसर्ग होत होता. त्यानंतर पुढील चार-पाच दिवस जोरदार पाऊस पडलाच नव्हता. तरीही हे धरण ओव्हरफ्लोच होते. धरणातील मोठमोठे झरे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले असल्याने पाऊस कमी-जास्त झाला तरी ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे धरण पूर्ण क्षमतेनेच भरलेले राहणार आहे.

शिळ धरण 4 जुलैच्या सकाळी पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहून जात होते. त्यानंतर चार ते पाच दिवस पावसाने दडी मारली होती. जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडण्याचा इतिहास असतानाही धरण पूर्ण क्षमेतेने भरल्यानंतर पुढील चार ते पाच दिवस चक्क ऊन पडत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होण्याची शक्यता असतानाही धरण ओव्हरफ्लोच आहे.
गेल्या मंगळवारपूर्वी काही दिवस पावसाच्या सरी कोसळल्या. परंतु, धरणातील जलसाठ्यात कोणतीही वाढ झाली नव्हती. या पावसाचे पाणी धरणाच्या जमिनीत मुरले गेले होते. त्यानंतर जोरदार पाऊस पडला आणि मोठमोठे झरे प्रवाहित झाले.
धरणातील मोठमोठे झरे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले असल्याने आता पाऊस कमी-जास्त झाला तरी धरणातील पाणी साठ्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोणताही फरक पडणार नाही. दरवर्षी हीच अवस्था असते, असे रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी विभागातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत शहराला पाणी पुरवठा करणारे हे शिळ धरण ओव्हरफ्लोच राहणार असल्याने शहरवासियांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शिळ धरणात आता 120.23 मीटर इतकी पाणी पातळी असून, विसर्ग 1.01 घनमीटर इतका प्रतिसेकंदाला होत आहे. आगामी काळात पावसाचे सातत्य राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.