शिवसेनेवर आलेले संकट परतवून लावण्याचा निर्धार करा: आ. भास्कर जाधव 

चिपळूण येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा

चिपळूण:- शिवसेनेच्या अस्तित्वावर आलेले हे मोठे संकट आम्ही परतवून लावू असा निर्धार व्यक्त करीत खासदार विनायक राऊत यांनी आगामी निवडणुकीत निर्धास्त रहावे. केवळ या दोन मतदारसंघाचीच आम्ही जबाबदारी घेणार नसून संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही शिवसेनेच्या नव्या उभारीसाठी लढू असा विश्वास आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

चिपळुणातील बाळासाहेब माटे सभागृहात सोमवारी शिवसैनिकांचा मेळावा झाला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार राजन साळवी, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात आ. जाधव यांचे भाषण लक्षवेधी ठरले. 

ते म्हणाले, राज्यात भाजपची पाच वर्षे सत्ता होती. यामध्ये शिवसेना सत्तेत असूनसुध्दा भाजपने कोकणच्या विकासासाठी निधी दिला नाही. पाणी योजनांपासून रस्त्यांपर्यंत एकही कामे त्यावेळी झाली नव्हती. जिल्हापरिषद सदस्य, सरपंच यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र, महाविकास आघाडी सरकार असताना गेल्या अडीच वर्षात उध्दव ठाकरे यांनी कोकणच्या विकासासाठी अमाप निधी दिला. शिवसैनिकांनी कधीही विसरु नये, आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे स्पष्ट मत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.

मी स्वतः मुंबईत वरळीसह इतर ठिकाणी मेळावे घेतले. शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांना शिवसेनेचे महत्व पटवून दिले. आज या सर्वसामान्य शिवसैनिकांमुळेच मुंबईत शिवसेना वाढली. रोजगार मिळाले, याची आठवण करुन दिली. कोकणात शिवसेना वाढण्यासाठी अनंत गीतेंसह इतर अनेक नेत्यांनी जीवाचे रान केले. अशा स्थितीत पक्षावर आलेले हे संकट आपण दूर करुन केवळ कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकत राहण्यासाठी प्रयत्नशील राहूया असे आवाहन आ. जाधव यांनी केले.

 माजी खासदार अनंत गीते यांनी, कार्यकर्त्यांना आपण शिवसैनिक असल्याची आठवण करुन दिली. आपण अशा संकटकाळात शिवसेना पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी सुरुवातीलाच जिल्हाप्रमुख सचिन कदम यांना फोन करुन चिपळूण-गुहागर मतदारसंघाची जबाबदारी आता तुझ्याकडे आहे असे सांगून हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात सांगितले होते. त्याप्रमाणे आजच्या मेळाव्यात आपण सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मागे राहण्याचा निर्धार करुया, असे आवाहन केले.