शिवसेनेने 10 जुलैच्या मेळाव्यासाठी कसली कंबर; जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी 

रत्नागिरी:- राज्यातील सत्ता बदलानंतर प्रथम रविवार दि.१० जुलै रोजी रत्नागिरी तालुक्याचा शिवसेनेचा भव्य मेळावा शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते आ.राजन साळवी, संपर्क प्रमुख सुधीर मोरे या मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तर आ.उदय सामंत हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर होणार्‍या पहिल्याच मेळाव्यात शिवसैनिक शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतील शिंदे समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर राज्याती सत्तांतर झाले आहे. एकनाथ शिंदे हे भाजपच्या साथीने मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद सोडावे लागले होते. शिवसेनेतील बंडाळीत रत्नागिरी विधानसभेचे आमदार उदय सामंत सहभागी झाल्यामुळे आता खासदार विनायक राऊत, उपनेते आ.राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेने पुन्हा एकादा आक्रमक होण्याची शक्यता आहे.अशातच रविवार दि.१० जुलै रोजी शिवसेनेच्या रत्नागिरी तालुक्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणानुसार मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या सर्व शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, सरपंच यांनी शिवसैनिकांसह मेळाव्याला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या मेळाव्यात आ.राजन साळवी यांची शिवसेने उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यामेळाव्यात खासदार विनायक राऊत, उपनेते आ.राजन साळवी, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख प्रदिप ऊर्फ बंड्या साळवी , विधान सभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे यांनी केले आहे.