रत्नागिरी:- शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख, जिल्हा परिषद माजी शिक्षण व अर्थ सभापती भंडारी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद बोरकर (वय 69, रा. वरवडे, रत्नागिरी) यांचे शुक्रवारी (ता. 3) सायंकाळी अल्पशः आजारामुळे साडेसहाच्या दरम्यान निधन झाले. मागील काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, नातू, सुन, भाऊ आणि पुतण्या असा परिवार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावचे शरद बोरकर हे वादट गटातून जिल्हा परिषदमध्ये निवडून जात होते. मालगुंड, वरवडे, खंडाळा, वाटद, जयगड या परिसरामध्ये त्यांचा दबदबा होता. शिवसेना तळागाळात पोचवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. तालुक्याच्या राजकारणावरही वेगळी छाप उमटवली होती. जिल्हा परिषदेत काम करताना वाटद जिल्हा परिषद गटातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष योजना राबविली होती. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सदस्य म्हणून चांगले काम केले. शिवसेनेने त्यांच्या कामाची दखल घेत जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती पदाची जबाबदारी सोपवली. श्री. बोरकर यांनी त्याला चांगला न्याय दिला. सामान्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत त्यांना दादा या टोपण नावाने ओळखले जाईल. महिला बचत गट चळवळीला चालना देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. डायबेटीक फुड ही संकल्पना कळझोंडी बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी बाजारपेठेत आणली होती.
गेल्या काही वर्षात ते राजकारणापासून दूर होते. हरी भक्त पारायण बनलेल्या दादांनी कीर्तन आणि प्रवचनाचा मार्ग स्विकारला. या माध्यमातून जनतेचे प्रबोधन करण्यावर भर दिला. भंडारी समाजाचे नेतृत्व करताना विविध कार्यक्रम घेतले. जिल्हाध्यक्षपदाची धूराही त्यांनी स्विकारली. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. मागील दोन महिने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत अचानक मावळली. त्यांच्या निधनाने वृत्त कळताच राजकीय नेत्यांसह तालुक्यातील अनेकांनी शोक व्यक्त केला. शुक्रवारी रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.