रत्नागिरी:- घरातून न सांगता निघून गेलेली महिला शहराजवळील शिरगाव-शेट्येवाडी येथील खाडी किनारी बेशुद्ध अवस्थेत सापडली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
पल्लवी परशुराम गोताड (६०, रा. घडशीवाडी- शिरगाव, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ३१) रात्री अकराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी पल्लवी घरात कुणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली होती. बेपत्ता पल्लवीचा नातेवाईकांनी शिरगाव परिसरात शोधाशोध घेतली असता पल्लवी शिरगाव-शेट्येवाडी येथील खाडी किनारी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तात्काळ तिला उपचारासाठी रुग्णवाहिकेने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.