रत्नागिरी:- राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडी घडत असताना ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीने शिंदे गटासह भाजपला कोंडीत पकडले आहे. शिरगाव ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ताकद सार्यांना दाखवून देऊ, असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला. ते शिरगाव येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते.
रत्नागिरीत ३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. मात्र सार्यांचे लक्ष हे शिरगाव ग्रामपंचायतीकडे लागून राहिले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस अशी महाविकास आघाडी पुरस्कृत गाव पॅनल या निवडणुकीत उतरल्याने सार्यांचेच धाबे दणाणले आहेत. तर शिंदे गटानेही आपले पॅनल या ग्रामपंचायतीसाठी मैदानात उतरवले आहे. श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून शिरगाव ग्रामपंचायत ओळखली जाते. ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी आता सार्यांनीच आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उपनेेते आ. राजन साळवी हे शिरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जातीनिशी प्रचारात उतरल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. मोठमोठ्या प्रचाररॅल्या आणि सभांचा धडाकाच सुरू झाल्याने शिरगावमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक चैतन्य निर्माण झाले आहे.
नुकतीच आ. राजन साळवी यांची शिरगावमध्ये सभा झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिरगाव ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. भविष्यात स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार शिरगाववासियांना पहायला मिळणार आहे. आज शिरगाववासियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्वच्छ व फिल्टरपाणी मिळत नाही. मात्र महाविकास आघाडीची सत्ता येताच शिरगाववासियांना मुबलक फिल्टर केलेले पाणी मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिरगावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून आरोग्याच्या दृष्टीनेदेखील विचार होणे गरजेचे आहे. भविष्यात शिरगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये अत्याधुनिक आरेाग्यसेवा मिळतील. त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, त्याचबरोबर घनकचर्याचा प्रश्नदेखील मार्गी लावणार असून प्रत्येक प्रभागात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या घंटागाड्या यापुढे धावताना दिसतील.
ही केवळ आश्वासने नसून महाविकास आघाडीचा शब्द आहे, असे सांगून आ. साळवी पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क तसेच त्यांच्या करमणुकीसाठी एक स्वतंत्र हॉल उपलब्ध केला जाईल. शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एमआयडीसीच्या मोकळ्या जागेत नवीन उद्योग आणून गावातील तरुणतरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.
सध्याचे राजकारण हे सर्वसामान्य जनतेलादेखील रुचलेले नाही. जनतेच्या मनात रोष आहे आणि हा रोष मतपेटीतून व्यक्त होईल, असे सांगून शिरगाव ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहनदेखील आ. राजन साळवी यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार फैमिदा काझी, रझ्झाक काझी, विभागप्रमुख मयुरेश्वर पाटील, उपविभागप्रमुख प्रशांत सावंत, महेंद्र रावणांग, शेखर अवसरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.