रत्नागिरी:- शिरगांव ग्रामपंचायत हद्दीतील मजगांव रोडवरील स्वरुपानंदनगर येथील रहिवाशांच्या विहिरीचे पाणी सांडपाण्यामुळेच खराब झाल्याचा अहवाला झाडगांव प्राथमिक आरोग्य केंद्राने दिला. देवभूमी नगरातील सांडपाणी वहळातून थेट विहिरींजवळ जात असल्याने विहिरींचे पाणी दुषित झाले आहे. शिरगांव ग्रामपंचायतीने संबधीत सांडपाण्याची व्यवस्था करावी असे पत्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने शिरगांव ग्रामपंचायतीला दिले आहे. त्यामुळे आता शिरगांव ग्रामपंचायत कोणती कार्यवाहि करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मजगांव रोडवरील स्वरुपानंदनगर नगरातील सुमारे १० ते १५ ग्रामस्थांच्या विहिरीचे पाणी दुषित झाले आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विहिरीच्या पाण्याचे नमुने घेतले होते. याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मुख्य रस्त्याजवळून मच्छिवर प्रक्रिया करणार्या दोन कारखान्यांच्या सांडपाण्याची पाईप लाईन जाते. पाईप लाईन लिकेज झाल्याने विहिरींचे पाणी दुषित झाले का ? हे शोधण्यासाठी हे नमुने घेण्यात आले होते. मात्र मच्छि कारखान्यांच्या सांडपाण्यातील कोणतेही घटक विहिरीतील पाण्यात आढळलेले नाहीत.
झाडगांव प्राथमिक आरोग्य केेंद्राने विहिरीतील पाण्याचे नमुने घेतले होते. त्याचाहि अहवाल प्राप्त झाला आहे. त्या अहवालात शौचालयाच्या सांडपाण्याचे अंश आढळले आहेत. त्यामुळे मानवी वस्तीतून येणार्या सांडपाण्यामुळे विहिरींचे पाणी दुषित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. देवभूमी नगरात सुमारे २५० घरांची वस्ती आहे. त्यांचे सांडपाणी याच भागातून खाली जाते. संबधित घरांचे सांडपाणी पाईपलाईनद्वारे खाली सोडणे आवश्यक असताना ते विहिरीजवळ सोडण्यात आल्याने विहिरींचे पाणी दुषित झाले आहे.