रत्नागिरी:- शहरालगतच्या शिरगांव ग्रामपंचायत येथून बांग्लादेशी नागरिकाला जन्मदाखल दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई येथे या बांग्लादेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रावरुन ही बाब समोर आली. दरम्यान याप्रकरणी जन्मदाखला देणाऱ्या तात्कालीन शिरगांव सरपंच व ग्रामसेवक यांना मुंबई येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.
मोहम्मद इद्रीस इसाक शेख असे मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी नागरिकाचे नाव आहे. मुंबई पोलिसांकडून शेख याला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याजवळ शिरगांव ग्रामपंचायत येथील जन्मदाखला असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार त्याचे जन्मदाखल्यावर पत्ता जन्म १ मे १९८३ रोजी उद्यमनगर पडवेकर कॉलनी, ता. जि रत्नागिरी असा आहे. तसेच आईचे नाव शाहिदा बेगम मोहम्मद इसाक शेख व वडिलांचे नाव मोहम्मद इसाक शेख असे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासामध्ये शेख याने खोटा जन्मदाखला तयार केल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.