13 शाळाबाह्य मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात
रत्नागिरी:- कोरोनामुळे अनेक कुटूंबांनी स्थलांतर केले असून त्यांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी शिक्षण विभागाकडून 10 मार्चपर्यंत शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम हाती घेतली आहे. गेल्या तिन दिवसात शिक्षकांनी 44 हजार 5 कुटूंबांना भेट दिल्या असून 13 शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. तसेच 185 मुले ही स्थलांतरीत असून त्यांनी पुर्वीच जवळच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन ठेवला आहे.
शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील एकही मुल शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शासनाच्या आदेशानुसार शाळाबाह्य शोध मोहीमेला सुरवात झाली आहे. काही शिक्षकांनी कोरोनाचे कारण देत घरा-घरात जाऊन सर्व्हे करण्याबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली आहे; परंतु ग्रामीण भागामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांनी शाळा मुले शोधण्यास सुरवात केली आहे. कोकण आणि मुंबईचे जवळचे नाते आहे. अनेक चाकरमानी कुटूंबांसह मुंबईत वास्तव्य करतात. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर अनेक मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतले आहेत. त्यातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी ही शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. 1 मार्चपासून सुरवात झाली असून तिन दिवसात 44 हजार 5 कुटूंबांना शिक्षकांनी भेटी दिल्या. त्यातील 13 मुले शाळाबाह्य आढळली असून त्यात 6 मुले आणि 7 मुलींचा समावेश आहे. परराज्यातून विविध कामांसाठी आलेल्या कुटूंबांचा यात समावेश आहे. यामध्ये 2 मुले ही दिव्यांग आहेत. तसेच 185 मुले स्थलांतरीत होऊन रत्नागिरी जिल्ह्यात आली असून ती आधीच शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. यापुर्वी स्थलांतरीत होऊन आलेल्या 17 जणांनी पुन्हा परजिल्ह्यात जाणे पसंत केले आहे.