शिक्षक विनंती बदल्या लांबणीवर; 3 सप्टेंबरनंतरच मिळणार मुहूर्त

रत्नागिरी:- सुट्टीमुळे अनेक अधिकारी, कर्मचारी गणेशोत्सवात व्यस्त आहेत, तर पदाधिकारीही जिल्हा परिषदेकडे फिरकलेले नसल्यामुळे शिक्षकांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया आणि आंतरजिल्हा बदलीने जाणार्‍या शिक्षकांच्या निर्णयावर 3 सप्टेंबरनंतर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याला शिक्षण विभागाकडूनही दुजोरा मिळालेला आहे.

कोरोनामुळे गणेशोत्सवापुर्वी जिल्हा परिषदेतील कामकाजावर परिणाम झालेला होता. अकरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण होते. प्रशासनाने आठ दिवसांसाठी कर्मचारी उपस्थितीसह अभ्यागतांवर निर्बंध आणले होते. त्यामुळे शासनाकडून आलेल्या विनंती बदल्यांच्या आदेशाची अंमजबावणी करता आलेली नव्हती. गणेशोत्सवात सर्वचजणं व्यस्त असल्याने ही प्रक्रिया अद्यापही झालेली नाही. जिल्ह्यातील चारशे शिक्षकांनी विनंती बदल्यांसाठी शिक्षण विभागाकडे अर्ज केले आहेत. ही प्रक्रिया कशी राबवायची यावर पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक झालेली नाही. दुसरीकडे आंतरजिल्हा बदलीन परजिल्ह्यात जाण्यासाठी 330 शिक्षकांना शासनाकडून हिरवा कंदिल दिला आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांच्या परिस्थितीचा विचार करुनच हा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी सविस्तर चर्चा करणे गरजेचे आहे. त्या शिक्षकांना सोडण्याचा निर्णय घेताना शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या गणेशोत्सवात सर्व जणं व्यस्त असल्यामुळे सुट्टी संपल्यानंतरच बदलीपात्र शिक्षकांना दिलासा मिळणार आहे. अध्यक्ष रोहन बने आणि शिक्षण सभापती सुनील मोरे 3 सप्टेंबरला उपस्थित राहीले तर त्यावर त्वरीत निर्णय होणार आहे.