जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रियेनंतर समुपदेशन घेण्याची मागणी
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांवर पवित्र पोर्टलद्वारे 1 हजार 13 उमेदवारांची निवड केली आहे. त्यांची कागदपत्र पडताळणी झाली असून समुपदेशनाद्वारे त्यांना जिल्ह्यात नियुक्त्या रिक्त शाळात दिल्या जाणार आहेत. मात्र ही प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वच प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर समुपदेशन घ्यावे अशी मागणी केली आहे. याला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून दुजोरा मिळाला आहे.
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. यामधून रत्नागिरी जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 हजार 68 उमेदवारांची निवड केली गेली होती. कागदपत्र पडताळणीसाठी 1 हजार 13 उमेदवार हजर होते. त्यांची कागदपत्र योग्य असल्याचा शेरा दिल्यांनतर जिल्ह्यातील रिक्त शाळांवर नियुक्ती देण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या तारखा येत्या आठवडाभरात होतील अशी आशा नव्या उमेदवारांना होत्या; परंतु राज्यातील शिक्षक संघटनांनी नव्या उमेदवारांना रिक्त शाळा देण्यापुर्वी कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत प्रक्रिया पुर्ण करावी अशी मागणी शासनाकडे केली आहे. बदली प्रक्रिया राबविल्यास नव्या उमेदवारांची नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकुन पडण्याची शक्यता आहे. जिल्हांतर्गत बदलीचा प्रश्न सोडविल्यानंतरच नवीन उमेदवारांसाठी समुपदेशन घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे नवीन शिक्षकांच्या नियुक्त्या लवकरात लवकर करावी अशी मागणी होत आहे. जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया लांबली तर आचारसंहितेत अडकुन पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.