चिपळूण:- खेर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने शिरगावमधील एका महिलेची वीस लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी त्या संशयित शिक्षकांवर अलोरे शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी महिला शिरगावच्या वरच्या पेठेत राहते. खेर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या सचिन चांगदेव वेळवी (वय ३६) याच्याशी त्या महिलेची ओळख झाली. त्याने संबंधित महिलेकडून गुगल पे आणि चेकच्या माध्यमातून वेळोवेळी २२ लाख ६६ हजार २३४ रुपये घेतले. त्या बदल्यात चांगला परतावा देण्याचे आमिष त्याने दाखवले होते. ७ जुलै २०२३ पासून डिसेंबर २०२३ पर्यंत त्या महिलेने या शिक्षकाकडे पैसे जमा केले. सुरुवातीला या शिक्षकाने त्या महिलेला १ लाख ८४ हजार २२५ रुपये परत केले; मात्र उर्वरित रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली. या महिलेने त्या शिक्षकाशी वारंवार संपर्क करून आपण गुंतवलेले पैसे परत देण्यासाठी तगादा लावला; मात्र संबंधित शिक्षकाने ते पैसे परत केले नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अखेर महिलेने अलोरे शिरगाव पोलिसामध्ये संबंधित शिक्षकाच्याविरोधात तक्रार दिली. आपली २० लाख ८२ हजार ९ रुपयाची फसवणूक झाल्याची तक्रार त्या महिलेने केली आहे.