रत्नागिरी:- शिकारीसाठी गेलेल्या शिकाऱ्याच्या बंदुकीतील गोळी सुटून शिकाऱ्याचाच मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली पारवाडी येथे 25 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी रत्नागिरी उपविभागीय पोलिस अधिकारी आणि लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नाटे पोलिसांचा कसून तपास सुरु आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी नाटे पोलीस ठाण्याला तातडीने भेट देऊन अधिक माहिती घेतली होती. 5 दिवसांनी 2 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवार 25 जानेवारी रोजी दुपारी राजापूर तालुक्यातील नवेदर – भिकारवाडी येथील अनिल शंकर भालवलकर (वय 41) आणि संजय विठ्ठल पड्यार (वय 47) हे दोघेजण शिकारीसाठी धाऊलवल्ली पारवाडी येथील जंगलात गेले होते अशी सुरुवातीला माहिती उपलबध झाली होती. यावेळी शिकारीसाठी नेलेल्या बंदुकीतून अचानक गोळी सुटून ती अनिल शंकर भालवलकर याच्या पोटाच्या भागाकडे लागली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत माहिती मिळताच नाटे पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी लांजा यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान आतापर्यंत पोलिसांचा तपासच सुरु आहे. पोलीसांनी याची पाळेमुळे खणून काढण्याचा चंग बांधला आहे. दरम्यान या प्रकरणी नाटे पोलिसांनी आता पर्यंत 9 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु आता या प्रकरणी संजय विठ्ठल पड्यारसह मयत या 2 जणांवर भादविस कलम 304 सह भारतीय हत्यार अधिनियम 1959 चे कलम 30 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान संजय विठ्ठल पड्यार या संशयित आरोपीला राजापूर न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अजून काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता सूत्रांकडून समजते.