शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचीच शिकार; अन्य दोघे जखमी 

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील शिरगाव परिसरातील तीन मित्र शिकारीसाठी दुचाकीवरून ट्रिपल सीट गाडीवरून जात असताना हातातील बंदूक खाली पडून फायर झाले व त्यातून सुटलेल्या छऱ्याने शिरगाव येथील तुषार विश्वास साळुखे या युवकाचा बळी गेला तर अन्य दोघे गंभीररीत्या जखमी झाले. यातील एकाला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. हा प्रकार तळसर बोधवाडी ब्रिजजवळ रविवारी रात्री २ च्या सुमारास घडला. याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद आहे.

शिरगाव परिसरातील तुषार विश्वास साळुखे (२०), शुभम दिनकर नलावडे (२०) व तळसर येथील निखिल बळवंत राजेशिर्के (२२) हे तिघेजण क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी जातो, असे सांगून घरातून निघून गेले. त्यानंतर एका दुचाकीवर हातात बंदूक घेऊन शिकार करण्यासाठी तळसरच्या जंगलात जात होते. यावेळी रविवारच्या मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास दुचाकी एका वळणावर आली असता त्यातील एकाच्या हातातील बंदूक खाली पडून अचानक ट्रिगर दाबला जाऊन फायर सुरू झाले आणि एकापाठोपाठ एक छरे तुषारच्या शरीरात घुसले तर शुभमच्या डोक्यात घुसले तर निखिलच्या हाताला लागले त्यामुळे तिघेही गंभीररित्या जखमी झाले.

त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना चिपळूण येथील अपरान्त हॉस्पिटलमध्ये रात्री ३.३० वा. आणण्यात आले. यावेळी तुषार साळुखे यांच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला तर शुभम नलावडे याच्या डोक्यात गोळी गेल्याने त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले तर निखिल राजेशिर्के याच्यावर सावर्डे येथे उपचार
सुरू आहेत. याबाबत अपरान्त हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सद्गुरू पाटणकर यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करीत आहेत तर शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद झाली आहे.