रत्नागिरी:- शहरातील अभ्युदयनगर‚ गोडबोले नगरमधील प्राथमिक शाळेचे आरक्षण बदलून तेथे आध्यात्मिक केंद्राचे आरक्षण टाकण्याचा घाट घालण्यात आला होता; मात्र त्याला विरोध झाल्यामुळे ती भूमिका बारगळली आहे.आता हे आध्यात्मिक केंद्र शहरातील एखाद्या उद्यानात उभारण्याचा विचार सुरू झाला आहे.
अभ्युदयनगर गोडबोले नगरातील आरक्षण क्र. १०६ ची जागा प्राथमिक शाळेच्या प्रयोजनासाठी रत्नागिरी पालिकेला देण्यात आली. येथे भास्कर दत्तात्रय गोडबोले प्राथमिक विद्यामंदिर सुरू होते. ही शाळा बंद पडली असली तरी या जागेतील प्राथमिक शाळेचे आरक्षण कायम होते; परंतु काही दिवासांपासून हे आरक्षण उठवून तेथे आध्यात्मिक केंद्राचे आरक्षण करण्याचा ठराव करण्यात आला. पुढील प्रक्रियेनुसार नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या. नागरिकांनी याला तीवÏ विरोध करून आक्षेप नोंदवण्यात आले. आरक्षण बदलण्यास नागरिकांची नापसंती असल्याचे स्पष्ट निदर्शनास आले. त्यामुळे पालिकेने नागरिकांच्या आक्षेपाची दखल घेत आरक्षण क्र. १०६ चे आरक्षण बदलण्याचा विचार सोडून दिला आहे.
आता हे आध्यात्मिक केंद्र शहरातील कोणत्या उद्यानात होऊ शकेल याची चाचपणी सुरू आहे. आरक्षण बदलण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते ॲड. अमेय परूळेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शवला होता. त्यामुळे पालिकेला आता आपली भूमिका बदलावी लागली आहे. परिणामी, गोडबोले नगरातील आरक्षण प्राथमिक शाळेसाठी कायम ठेवले आहे.