चिपळूण:- शहरातील एका परिसरात शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या एका तरुणाला जमावाने चांगलाच चोप दिल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे त्या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन न करता सोडून देण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
ही शाळकरी मुलगी रस्त्याने जात असतानाच या तरुणाने तिची छेड काढली. छेड काढण्याचा प्रकार पुढे येताच त्याच क्षणी त्या तरुणाला पकडण्यात आले. छेड का काढलीस असा जाब विचारत काही नागरिकांनी त्या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला एक-दोन नागरिकांनंतर तेथे जमलेल्या काही तरुणांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्या तरुणाचा शर्टही फाटला. भर रस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे त्या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी त्या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रकार घडला. दरम्यान, या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन न करता त्याला सोडून देण्यात आल्याने या विषयांवर पडदा पडला.