रत्नागिरी:- शहरातील ओसवाल नगर येथील उतारामध्ये शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी रिक्षा उलटून झालेल्या अपघातात तीन विद्यार्थी जखमी झाले झाले असून तीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. ही घटना तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
शहरातील नाईक हायस्कूल सुटल्यानंतर सहा विद्यार्थी रिक्षामधून घरी जात होते. यावेळी ओसवाल नगर येथील उतारामध्ये रिक्षा उलटली. यात तीन विद्यार्थ्यांच्या हातापायाला व डोक्याला दुखापती झाल्या आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उर्वरीत विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या व मुका मार बसला.
शालेय विद्यार्थ्यांना घेऊन रिक्षा जात असताना ओसवाल नगर येथील उतारात रिक्षाचे ब्रेक निकामी झाले. यावेळी वहाळावरील कठड्याला आणि समोर उभ्या असणार्या रिक्षाला धडक दिली. त्यामुळे रिक्षा उलटली. वहाळावरील कठड्याला रिक्षा धडकली नसती तर थेट वहाळात गेली असती, त्यामुळे अपघाताची गंभिरता वाढली असती. अपघातानंतर मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक घटनास्थळी गोळा झाले होते.
जखमी विद्यार्थ्यांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, त्यामुळे रिक्षामधून होणार्या विद्यार्थी वाहतुकीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.