शालेय पोषण आहार आता आधार कार्डसोबत संलग्न होणार 

रत्नागिरी:- राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांनाच आता शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून ते शालेय पोषण आहाराशी जोडण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले असून, अद्याप आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे काम शिक्षकांना करावे लागत आहे.

वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाभार्थ्यांचा माहितीसाठा (डेटाबेस) तयार करून तो आधार कार्डशी जोडला जाणार आहे. त्यानुसार शालेय पोषण आहार योजनेचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी प्रक्रिया डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे.
यासाठी पात्र सर्व शाळांतील लाभार्थ्यांची आधारकार्ड नोंदणी पूर्ण झालेली असणे आवश्य आहे. मात्र अद्यापही काही लाभार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची आधार नोंदणी करून घेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे दर महिन्याच्या 28 तारखेपर्य या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून शिक्षणाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे 1 जानेवारी 2023 पासून आधार कार्डची जोडणी शालेय पोषण आहाराशी असलेल्या विद्यार्थ्यांनाच शालेय पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या निर्दे शांनुसार केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांडून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून ते संलग्न करण्यात येत असून शिक्षकांना आधार कार्ड जोडणीचे अतिरिक्त काम करावे लागत आहे.

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी शिक्षक काम करत आहेत. मात्र कागदपत्रे अपूर्ण असणे, विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसे न उमटणे आदी तांत्रिक अडचणी येत आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या पत्रानुसार डिसेंबर अखेरपर्यंत आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. आधार जोडणी नसलेल्या विद्यार्थ्यांना जानेवारीपासून शालेय पोषण आहारापासून वंचित ठेवले जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.