पालकमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा ; साळवी स्टॉप येथील आरक्षित जागेचा विचार
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील सुमारे ८५० झोपडीधारक आणि हमाल पंचायतीच्या काहीजणांना लवकरच पक्की घरे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर बैठक झाली. शहरातील साळवी स्टॉप येथे त्यासाठीची जागा आरक्षित आहे. जागा देण्यापेक्षा या सर्वांसाठी बिल्डिंग बांधून प्रत्येकाला वन आरके ब्लॉक म्हणजे हक्काचे घर देऊन शहर झोपडपट्टीमुक्त करू, असा निर्णय बैठकीत झाला.
रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना आणि वाल्मिक आवास योजनेअंतर्गत शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची योजना आहे. या योजनेतून नोंदणीकृत झोपडीधारकांचे पालिकेमार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये झाडगाव, मुरूगवाडा, आठवडा बाजार, साळवी स्टॉप आदी ठिकाणच्या सुमारे ८५० झोपड्या असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पालिकेने त्यांना जागा उपलब्ध करून पक्की घरे बांधून देण्याची ही योजना आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून याचे घोंगडे भिजत पडले होते. त्याला कोणतीही चालना मिळत नव्हती; मात्र उदय सामंत पालकमंत्री झाल्यानंतर झोपडपट्टी आणि हमाल पंचायतीचे काही लोक त्यांना भेटले. त्यांच्या भेटीनंतर याबाबत महत्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
शहरातील साळवी स्टॉप येथे यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. या जागेत शहर झोपडपट्टीमुक्त करण्याकरिता जागा देऊन पक्की घरे बांधून देण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार होता; मात्र त्याचा पाठपुरावा न झाल्याने अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. पालकमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत प्रत्येकाला जागा देऊन घरे बांधण्यापेक्षा आरक्षित जागेत मोठी इमारत बांधून त्यामध्ये नोंदणीकृत झोपडीधारकांना वन आरके ब्लॉक (पक्के घर) देऊ, असा निर्णय झाला. यामध्ये हमालांचाही समावेश असून त्यांनाही पक्की घरे दिली जाणार आहेत. त्यामुळे लवकरच शहर झोपडपट्टीमुक्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.