रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नवीन नळपाणी योजनेतील अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे झालेले काम किती गुणवत्तापूर्ण आहे याचा अनुभव गणेशोत्सवात आला. गेल्या दहा दिवसात तब्बल 10 ठिकाणी अंतर्गत जलवाहिनी फुटली. त्यामुळे सणासुदीच्या दिवशी त्या-त्या ठिकाणच्या रहिवाशांना वेळेत पाणी मिळू शकले नाही. शहराला पाणी पुरवठा करणारे शिळ धरण अजूनही ओसंडून वाहत आहे. तरीही रोजच्या रोज कुठे ना कुठेतरी जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद ठेवावा लागत आहे.
नवीन नळपाणी योजनेंतर्गत शहरात अंतर्गत जलवाहिन्या अंथरण्यात आल्या. या जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यांमध्ये खोदाई करण्यात आली. तेथे काम पूर्ण झाल्यानंतर भराव योग्यरित्या न केल्याने तीन महिन्यांपूर्वी डांबरीकरण केलेले रस्ते खचले गेले. त्यातूनच पुढे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले.
एकीकडे खड्डे पडत असतानाच गेल्या 10 दिवसात वेगवेगळ्या दहा ठिकाणी नवीन जलवाहिनी फुटली. जेथे दोन पाईप जोडण्यात आले आहेत तेथील कपलिंग तुटून जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत आहेत. शुक्रवारी जिल्हा रूग्णालयासमोर आणि इतर काही ठिकाणी जलवाहिनी फुटली. शनिवारी राम मंदिराजवळ जलवाहिनी फुटली. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पाण्याची टंचाई जाणवली. मात्र रत्नागिरी नगर परिषदेकडून ही दुरूस्ती करून त्या-त्या ठिकाणी उशिरा का होईना पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न झाला.
रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे शिळ धरण गेल्या महिन्यापासून ओसंडून वाहत आहे. धरणात असे मुबलक पाणी असताना जलवाहिनी फुटू लागल्याने शहरवासियांच्या पाणीपुरवठ्यात अडथळे येत आहेत. नवीनच असलेल्या जलवाहिनी फुटत असल्याने नवीन नळपाणी योजनेचे काम किती गुणवत्तापूर्ण आहे याचा अंदाज येत आहे. दरम्यान, नवीन अंतर्गत जलवाहिन्या रस्त्यांमधूनच गेल्या असल्याने त्या फुटल्यानंतर जेसीबीने खोदाई करावी लागते. दुरूस्ती काम झाल्यानंतर तेथे भराव झाल्यानंतर पुन्हा पाऊस आणि वाहतुकीमुळे खड्डे पडत आहेत.