शहरात कुत्र्यांच्या दहशतीच्या पालिकेकडे पुन्हा तक्रारी

नव्याने निर्बिजीकरणाची मोहिम; चार वर्षांमध्ये ६ हजार ५०० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया

रत्नागिरी:- शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे. एकीकडे कुत्र्यांना विष घालून मारल्याचा प्रश्न गाजत असताना दुसरीकडे या कुत्र्यांची दहशत वाढत चालल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत. मात्र त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागविले आहे. तर पालिकेने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणि उत्पत्ती थांबविण्यासाठी पुन्हा निर्बिजिकरणाची मोहिम हाती घेतली आहे. सुमारे २५ लाखाची निविदा त्यासाठी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये सुमारे ६ हजार ५०० कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.  

गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये विष घालून मारण्यात आलेल्या २१ भटक्या कुत्र्यांचा विषय चांगलाच चर्चेला होता. या घटनेने अनेकांकडे संशयाच्या नजरेना पाहिले जात होती. प्राणीमित्रांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सीसी टिव्ही फुटेज पाहुन कदम नामक एका संशयिताला ताब्यात घेतले. यामध्ये एका लोकप्रतिनिधीचे नाव पुढे येत होते. मात्र चौकशी दरम्यान काहीच हाती लागले नाही. हा विषय ताजा असताना आज काही नागरिकांनी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्याकडे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत
तक्रार केली आहे. साळवी स्टॉप येथील कचऱ्याजवळ भटक्या कुत्र्यांचा मोठा कळप असतो. बाजूच्या रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर ही कुत्री येतात. त्यामुळे त्या भागात कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. पालिकेने यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रदीप सावंत यांनी नगराध्यक्षांकडे केली आहे. 

शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे कुत्रे अचानक हल्ला करीत असल्याच्या तक्रारी आल्याचे नगराध्यक्ष श्री. साळवी यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबावा यासाठी गेल्या चार वर्षांपासून पालिकेने केलेल्या निर्बिजिकरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यामध्ये आतापर्यंत ६ हजार ५०० कुत्र्यांचे निर्बिजिकरण झाल्याचा दावा पालिकेने केले आहे. तर गेल्या वर्षी १ हजार ८४० कुत्र्यांचे निर्बिजिकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यावर सुमारे ४५ ते ५० लाखाच्यावर खर्च करण्यात आला आहे. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत तक्रारी वाढल्यनंतर पालिकेने पुन्हा या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहित हाती घेण्याचे नियोजन केले आहे. सुमारे २५ लाख रुपये खर्च करून पुन्हा ५ ते ६ हजार कुत्र्यांचे निर्बिजिनकर करण्याचे उद्दीष्ट पालिकेसमोर आहे.

निर्बिजिकरण करण्यासाठी रोट्रीक्लब, येथील पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश भागवत हे पालिकेला मदत करण्यास तयार आहेत. डॉ. भागवत
यांनी तर यंत्रणा आणि साहित्य दिल्यास मोफत निर्बिजिकरण करू, असेही स्पष्ट केले आहे.