रत्नागिरीः– नगर रचना योजनेअंतर्गत दोन टप्प्यात तब्बल 20 आरक्षित जागा पालिकेच्या मालकीची झाली आहे. शासनाच्या निर्णयानुसार अल्प मोबदल्यात ही जागा नगरपालिकेला मिळाली आहे. त्यामुळे आवश्यक आरक्षणे विकसित झाल्यानंतर शहरवासियांना नवनवीन सुविधा उपलब्ध होणार आहेत.
रत्नागिरी नगरपालिकेला नगररचना योजना दोन टप्प्यात मंजूर झाली होती. या योजनेअंतर्गत 20 आरक्षणांची जागा पालिकेच्या मालकीची करण्याला शासनाने मंजुरी दिली होती. यापैकी काही आरक्षणांचा ताबा जिल्हाधिकार्यांमार्फत पालिकेने घेतला होता. ती आरक्षणे पूर्णतः विकसित करण्यात आली आहेत. त्यामध्ये उद्यान, छत्रपती शिवाजी स्टेडियम, पालिका मच्छ मार्केट, गृहनिर्माण वसाहत, कर्लेकर वाडी येथील पार्किंग प्लॉट, ड्राम थिएटर या आरक्षणाचा समावेश होता. सुमारे 52 कोटी 32 लाख 13 हजार 877 रु.ची जागा शासनाच्या आदेशामुळे पालिकेला अल्प मोबदल्यात प्रप्त झाली आहे.टप्पा दोनमध्ये दहा आरक्षणांचा समावेश होता. सुमारे 30 कोटी 28 लाख 37 हजार रु.जागेच्या मोबदल्याची रक्कम होते. परंतु शासनाच्या सन 1974 च्या आदेशाप्रमाणे संबंधित जागा त्यावेळच्या मोबदल्यानुसार जागा मालकाकडून घेण्यात आली. त्याचदराने संबंधितांना मोबदला दिला जाणार आहे. तर काहींना मोबदला देण्यात आला आहे. या दहा आरक्षणांमध्ये रिक्रीएशन ग्राउंड, पार्किंग, ओपन स्पेस, स्विमिंग पुल, शॉपिंग सेंटर, कम्युनिटी सेंटर, हाऊसिंग फार्म, डिसहाऊस्ड ,प्रथमिक शाळा, उद्यान याचा समावेश आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे तब्बल 150 कोटी किंमत असलेली आरक्षणे शासनाच्या तत्कालीन आदेशाप्रमाणे पालिकेला उपलब्ध झाली आहेत. संबंधित जागेचा सातबारा पालिकेच्या नावे झाला आहे. त्यामुळे या आरक्षणांचा उर्वरित विकास करण्याची जबाबदारी पालिकेवर आली आहे.