गुन्हेगार, गैरप्रकारांना बसणार चाप ; नवीन सिग्नल यंत्रणा लवकरच
रत्नागिरी:- शहरामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पसरवण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. ठेकेदाराकडून कॅमेरा बसवण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरअखेर किंवा जानेवारीला हा सीसीटीव्ही प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. याचबरोबर अनेक वर्षे बंद पडलेली आणि शहरातील वाहतूककोंडी सोडवण्याच्यादृष्टीने महत्वाची असलेली सिग्नल यंत्रणाही सुरू करण्याचा प्रस्ताव पोलिसदलाने पालिकेला दिला आहे. डिसेंबरला ही सिग्नल यंत्रणा सुरू होणार आहे.
औरंगाबाद शहराच्या धर्तीवर रत्नागिरी शहरामध्ये अत्याधुनिक सीसीटीव्हीचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या प्रयत्नातून हा १ कोटीचा प्रकल्प सुरू झाला आहे. यामध्ये शहरांतील सर्व प्रवेशद्वारांपासून सावर्जनिक ठिकाणे, महत्वाची ठिकाणे, किनारे, बंदर, जेटी, एसटी बसस्थानक, काही संवेदनशील भाग आदी ठिकाणी ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. प्रजासत्ताकदिनी कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते या प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला. त्यासाठी ई-निविदा प्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील कंपनीने त्याचा ठेका घेतला आहे. कॅमेरा बसवण्यासाठी लागणारी यंत्रणा बसवण्याचे काम ठेकेदाराने सुरू केले असून आतापर्यंत २५ टक्के काम झाले आहे. यामध्ये एचडी, बुलेट आणि एएनपीआर अशा अत्याधुनिक पद्धतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा समावेश आहे. सीसीटीव्हीच्या जाळ्यामुळे गुन्हेगारी, गैरप्रकार, बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीला होणारा अडथळा, आदी बारीकसारीक हालचालींवर पोलिसांची नजर राहणार आहे.
नूतन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीदेखील शहराच्या सुरक्षेवर आणि वाहतूक कोंडीमध्ये लक्ष घातले आहे. त्यानुसार शहरात रस्त्यामध्ये वाहतुकीच्यादृष्टीने आवश्यक असणारे पट्टे मारण्याचे काम सुरू झाले आहे. आता अनेक वर्षे बंद असलेली आणि वारंवार त्यावर खर्च करूनही चालू न झालेल्या सिग्नल यंत्रेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील वाहतूक यंत्रणा सुरू करावी, असे पक्ष त्यांनी पालिकेला दिले आहे. त्यानुसार कोल्हापूर येथील ठेकेदाराकडून आधुनिक सिग्नल व्यवस्था रत्नागिरी शहरात बसवण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. डिसेंबरला सिग्नल यंत्रणा सुरू होण्याची शक्यता आहे.