रत्नागिरी:- नळपाणी योजना असो की अशोका गॅस कडून पाईपलाईनसाठी गेले काही महिने रस्त्याची खोदाई दोन-दोन वेळा होत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागामधील रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांचे 26 जानेवारीपर्यंत डांबरीकरण न झाल्यास नगरपरिषदेसमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा भिम युवा पँथरने मुख्याधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
नळपाणी योजना व गॅसपाईप लाईनसाठी शहरातील मुख्य रस्त्यांसह वाडीवस्त्यांवरील रस्तांचीही चाळण करण्यात आली आहे. अद्यापही खोदाईची कामे सुरु आहेत. खोदाईनंतर रस्ते व्यवस्थित करण्यात येत नसल्याने दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: महिला दुचाकीस्वारांसमोर धडपडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मुख्य रस्त्यावरील खोदाई करण्यात आलेले भाग नुकतेच डांबरीकरणाने बुजवण्यात आले असले तरी शहर परिसरातील अन्य रस्त्यांची दुर्दशाच झालेली आहे. त्यामुळे खोदाई झालेल्या भाग योग्य प्रकारे बुजवून त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी भिम युवा पँथरेने केली आहे.याबाबतचे निवेदन अध्यक्ष प्रितम आयरे, अमोल जाधव, दीपक जाधव, शरद सावंत व अन्य पदाधिकार्यांनी मुख्याधिकार्यांना निवेदन देऊन केली आहे. 26 जानेवारीपर्यत हे रस्ते डांबरीकरणाने बुजवले न गेल्यास नगर पालिकेसमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.