शहरातील रस्ते डांबरीकरणासाठी आणखी पाच कोटी

रत्नागिरी:- शहरातील खड्डेमय रस्ते चांगले होण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी प्रयत्न केले आहेत. यापूर्वी साडेबारा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. आता आणखी 5 कोटी 61 लाखाचा निधी शहराच्या रस्ते विकासासाठी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह आता गल्लीबोळातील सुमारे शंभर किमीचे रस्ते नव्याने केले जाणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात गुळगुळीत रस्त्यावरुन चालण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

गेल्या काही महिन्यामध्ये प्रचंड पावसात रत्नागिरी शहरातील रस्त्यांची वाताहात झाली होती. यामुळे सत्ताधार्‍यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत होते. शहरातील 56 रस्त्यांच्या कामांना यापूर्वीच उदय सामंत यांच्या प्रयत्नातून 12.50 कोटी इतका नीधी उपलब्ध झाला आहे, या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांच्या वर्क ऑर्डर देखील दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे पाऊस गेल्यानंतर तातडीने रस्त्याची कामे हाती घेतली जाणार आहेत.

रस्त्यांमुळे असलेली नाराजी नागरिकांनी ना. सामंत यांना वेळोेवेळी बोलून दाखवली होती. नागरिकांच्या मनातील विकासकामांबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी नुकसान ी ना. उदय सामंत यांनी प्रभागनिहाय बैठका घेतल्या. त्यामध्ये रस्ते, नळपाणी योजना, गॅसपाईपलाईन, अंडरग्राऊंड इलेक्ट्रीक केबल या वअन्य विकास कामांबाबत नागरिकांच्या मनामध्ये असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे शहरातील उर्वरीते गल्लीबोळातील रस्त्यांसाठीही निधी मंजूर करुन देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे शहरातील नवीन 36 कामांसाठी 5 कोटी 61 लक्ष इतका निधी नियोजन मंडळाकडून मंजूर केला असून पालकमंत्री अनिल परब यांनी देखील त्याला मंजुरी  दिली आहे.