रत्नागिरी:- सेंट्रल किचनच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी आल्या. दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. तक्रारीनंतर या प्रकरणी पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. अन्नाचे नमुने तपासणीसाठी ठाण्याला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर पोषण आहाराच्या निविदा प्रक्रियेचीही चौकशी लावली आहे.
जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी (कॅफो) यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी होणार आहे.
शहरातील शाळांना पोषण आहार वितरीत करण्यासाठी जिल्ह्याबाहेरील ३ ठेकेदार कंपन्यांना ठेका देण्यात आला. या ठेक्याबाबतही काही
प्रमाणात तक्रारी झाल्या. पोषण आहार वितरीत करण्याच्या पहिल्यात दिवशी शिर्के प्रशालेतील मुलांना देण्यात आलेल्या पोषण आहारातील भात कच्चा तर वरण बेचव होते. त्यामुळे मुलांनी हा पोषण आहार खाल्ला नाही. पर्यायी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली. पालिका प्रशासन आणि शिक्षण विभागाचे अधिकारी श्री. पाटील यांनी ठेकेदार कंपनीला ताकीद दिली. लगेच दुसऱ्या दिवशी दामले विद्यालयात एक तास पोषण आहार उशिरा गेला. मुले भुकेने व्याकुळ झाल्याचे निरीक्षणात आले. एवढे होऊनही तिसऱ्या दिवशी पटवर्धन हायस्कुलमधील
पोषण आहारात अळी मिळाल्याची लेखी तक्रारी शाळेच्या मुख्याद्यापकांनी दिली.
ठेकेदार कंपनी सुमार दर्जाचा पोषण आहार देऊन मुलांच्या आरोग्याशी खेळ करत आहे, अशी तक्रारी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली. त्यांनी यापुढे तक्रार आल्यास संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करू, असे आश्वासन दिले. तर निविदा प्रक्रियेबाबत झालेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी लावू असे आश्वस्त केले. त्यानंतरही पटवर्धन हायस्कुलमध्ये सुमार दर्जाचा आहार दिल्याची तक्रार शिक्षकांनी केली. यावरून पालिका मुख्याधिकाऱ्यांनी दोन्ही ठेकेदार कंपन्यांना
प्रत्येकी ५ हजार या प्रमाणे दंडात्मक कारवाई केली आहे. अन्नाचे नमुने तपासणीसाठी ठाण्याला पाठविण्यात आले आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली निविदा प्रक्रियेची चौकशी सुरू झाली आहे. पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी याला दुजोरा दिला.