शहरातील खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी ठेकेदारावरच

रत्नागिरी:- चार महिन्यांपूर्वी गुळगुळीत केलेले शहरातील रस्ते पुन्हा खड्डेमय झाले. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. रस्ते डांबरीकरणाचा ठेका देण्यापूर्वी ठेकेदारांसोबत याबाबत करार करण्यात आला होता. मात्र, रस्ते डांबरीकरणानंतर अवघ्या काही महिन्यात रस्त्यांची दुरवस्था झाली. खड्डेमय रस्त्यांची डागडुजी करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची असून याबाबत ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी बाबर यांनी दिली. 

शहरात नव्या पाणी योजनेचे काम हाती घेण्यात आल्याने संपूर्ण शहरात खोदकाम हाती घेण्यात आले. रस्त्यांच्या मधोमध खोदकाम करण्यात आल्याने रस्त्यांची पुर्णतः दुरवस्था झाली. रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ना. उदय सामंत यांनी कोट्यवधींचा निधी आणला. डांबरीकरणासाठी रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदार नियुक्त करून डांबरीकरणाचा ठेका दिला. मात्र, डांबरीकरणाआधी खोदकाम केलेल्या ठिकाणी डबर टाकून भराव व्यवस्थित न केल्याने पावसात शहरातील रस्त्यांची अवघ्या तीन महिन्यात पुर्णतः दुरवस्था झाली.

 अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले तर अनेक भागात रस्ते मध्यभागी खचण्याचे प्रकार घडले. तीन महिन्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने याला सर्वस्वी कंत्राटदारच जबाबदार असल्याचे नगर परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे. तीन महिन्यात नादुरुस्त झालेले रस्ते पुन्हा सुस्थितीत करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून याबाबत ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी बाबर यांनी दिली. पावसानंतर ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही बाबर यांनी सांगितले.